ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अयोध्येत धावत्या ‘वंदे भारत’ ट्रेनवर दोन्ही बाजुने दगडफेक

गोरखपूरहून लखनऊला जाणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. वंदे भारत (२२५४९) या हायस्पीड ट्रेनवर लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. यामध्ये रेल्वेच्या दोन डब्यांच्या काचा फुटल्या आहेत. ही घटना अयोध्येतील सोहवाल रेल्वे स्थानकाजवळ घडली. विशेष म्हणजे यापूर्वी देशातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेनला लक्ष्य करण्यात आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी मुन्नू पासवान आणि त्यांची दोन मुलं अजय पासवान आणि विजय पासवान यांच्यासह तिघांना अटक केली आहे. त्यांनीच ‘वंदे भारत’वर दगडफेक केल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या रेल्वेवर दगडफेक करण्याचं कारणंही तपासात उघड झालं आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुलै रोजी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेनने आरोपींच्या शेळ्यांना धडक दिली होती. या धडकेत रेल्वे रुळावर चरणाऱ्या सहा शेळ्यांचा मृत्यू झाला होता. या शेळ्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतप्त आरोपींनी ‘वंदे भारत’वर दगडफेक केली आहे.

विशेष म्हणजे गोरखपूर ते लखनऊ या ‘वंदे भारत’ ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ जुलै रोजी करण्यात आलं. या रेल्वेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर दोनच दिवसांनी या ट्रेनने आरोपींच्या सहा शेळ्यांचा जीव घेतला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी नियोजन पद्धतीने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजुने रेल्वेवर दगडफेक केली आहे. यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks