कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये कोट्यवधींच्या फसवणुकीच्या तक्रारी ; फसवणूकदार फरार झाल्याने गुंतवणूकदारांचे दणाणले धाबे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील मुरगूड व परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांच्या १० कोटींहून अधिक आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी मुरगुड पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. फसवणूक करणारेच आता फरार झाल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक फसवणुकीतून बनावट कंपन्या व त्यांचे एजंट मालामाल झाले आहेत, तरगुंतवणूकदार मात्र कंगाल झाले आहेत.
मुरगुड येथील धनशांती मल्टी ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीविरुद्ध प्रथम ३ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी आल्या. त्यानंतर या कंपनीचे दत्तात्रय दादू पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. यानंतर ऊसतोडणी कामगार ठेकेदारांकडूनही ऊस वाहतूकदारांची तीन ते चार कोटींच्या आर्थिक फसवणुकीच्या १५० तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या, त्या संदर्भातील गुन्हे नोंदवण्याचे काम सुरु होते; पण कारवाई मात्र झाल्याचे दिसत नाही.
ओमसाई ट्रेडिंग कंपनीच्या अजय जाधव याच्याकडून अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. याविषयी १६ जणांनी मुरगूड पोलिसांत आपल्या लेखी तक्रारी दिल्या आहेत. त्या तक्रारीनुसार ३ ते ४ कोटींची आर्थिक गुंतवणुकीची फसवणूक झाल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून येते. सध्या या कंपनीच्या मुरगूड येथील कार्यालयाला टाळे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर एजंट अजय जाधव हा आपल्या राहत्या घरालाही कुलूप लावून सहा महिन्यांपासून फरार आहे.
वेगवेगळ्या कंपन्यांनी व एजंटांनी गुंतवणूकदारांना चांगलाच चुना लावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हाती काहीच लागत नसल्याने त्यांनी हतबल होवून पोलिसांत धाव घेतली आहे. अनेकांनी आर्थिक लाभाच्या लालसेपोटी शेतजमिनी, प्लॉट व सोने विकून आर्थिक गुंतवणूक केली आहे. त्यांच्यावर आता कंगाल होण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी अशा फसव्या कंपन्यांविरुद्ध व ठकसेनांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांकडून होत आहे.
मुरगूड परिसरातील धनशांती मल्टी ट्रेडिंग सर्व्हिसेसबाबतचे यापूर्वीच दोन गुन्हे दाखल आहेत. मुरगूड तर “ओमसाई ” बद्दलच्याही तक्रारी आलेल्या आहेत. याची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती कारवाईबाबत पुढील निर्णय होईल.
– विकास बडवे (पोलीस निरीक्षक मुरगुड )