मोठी बातमी : वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

दाखल असलेल्या तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांना सहकार्य करण्यासाठी तसेच पिकअप गाडी सोडण्याकरिता स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास अॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे . यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
संजय मनोहर मोरे (57, पद – एएसआय, नेमणूक – विजापूर नाका पोलिस स्टेशन, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरूध्द विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांना सहकार्य करून त्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल न करण्याकरिता तसेच विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये जमा करून घेतलेली पिकअप गाडी सोडण्याकरिता सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मोरे यांनी त्यांच्याकरिता तसेच विजापूर नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनपुडे पाटील यांच्याकरिता तक्रारदाराकडे 5 लाखाच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, पहिला हप्ता म्हणून 3 लाख रूपयाची लाच स्विकारण्यास संमती दिल्याप्रकरणी अॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर पोलिस अधीक्षक शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक गणेश कुंभार , पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक , पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी , पोलिस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, पोलिस अंमलदार सलिम मुल्ला आणि चालक राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.