कोल्हापूर शिवसैनिकांच्या वतीने खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा

कोल्हापूर प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
कोल्हापूर शिवसेनेची बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेले कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर शिवसेनेच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला.
खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात सामील झाल्याने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे. शिंदे गटात सामील होण्याअगोदर बंडखोर खासदार संजय मंडलिक यांनी विशेष म्हणजे शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढला होता.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगत गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते 24 कॅरेट सोने असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांनीच बंडखोरी केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
मंडलिक यांनी एका सभेमध्ये राजेश क्षीरसागर यांच्यावर बेन्टेक्स म्हणून टीका केली होती पण काही दिवसातच खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात उडी मारल्याने शिवसैनिकांनी त्यांना बेन्टेक्स खासदार गद्दार खासदार असे म्हणत संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा काढला आणि त्यांनी राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवावे असे म्हटले आहे.त्यांनी गद्दारी केल्याचा आरोप करत जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आज त्यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे.
त्यांनी केलेली चूक सुधारली नाही, तर त्यांचा दोन लाख मतांनी पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांनी यावेळी दिला. मोर्चामध्ये संजय मंडलिक यांचे बेंटेक्स घातलेले फलक मोर्चामध्ये चांगलेच लक्ष वेधून घेत होते. खासदार गद्दार अशा घोषणाही संतप्त शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.
या मोर्चामध्ये जिल्हाप्रमुख विजय देवणे,जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना दक्षिण शहर प्रमुख रविकिरण इंगवले, मंजीत माने आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.