हनुमान चालीसा पठणाचा विषय तापला, राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी मुंबईत शिवसेना आक्रमक

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
गेले काही दिवसांपासून हनुमान चालीसा पठण आणि मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर येऊन हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला. राणा दाम्पत्य २३ एप्रिलला म्हणजे उद्या हनुमान चालीसाचं वाचन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ बाहेरील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी मध्यरात्री मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केली आहे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण केलं नाही तर आपण मातोश्रीसमोर जाऊन पठण करु असं आव्हान आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. त्यानुसार आमदार रवी राणा आज (२२ एप्रिल) अमरावतीमधून निघणार असून उद्या (२३ एप्रिल) मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यांच्यासोबत सुमारे ६०० हून अधिक कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमणार आहेत . त्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला आहे.अमरावतीत शिवसैनिकांकडून राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात, असे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या राणा दाम्पत्य नेमके कुठे आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, शिवसैनिकांनी सर्व शक्यता गृहीत धरून राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी मुंबईत ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. राणा दाम्पत्य विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत येऊ शकते, ही शक्यता गृहीत धरून शिवसैनिक शुक्रवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) पोहोचले. मात्र, विदर्भ एक्स्प्रेस काहीवेळापूर्वीच मुंबईत दाखल झाली आहे. त्यामधून राणा दाम्पत्य उतरलेले नाही. त्यामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा कोणत्या मार्गाने मुंबईत दाखल होतात, हे पाहावे लागेल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त केला आहे.दरम्यान, हनुमान चालीसा वाचण्यासाठी महाविकास आघाडीची परवानगी घ्यावी लागते का ? असा सवालही रवी राणा यांनी उपस्थित केला. आम्ही अत्यंत श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत. अनेक संकटांना सामना करण्याची आमची तयारी आहे, आम्ही जाणार म्हणजे जाणारच असा निर्धारही राणा यांनी बोलून दाखवला. रवी राणा यांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.