महापालिकेतील अग्निशमन अधिकारी सव्वा लाखाची लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

फायर फायटिंग सिस्टम बसविल्याच्या कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात 1 लाख 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगली महापालिकेच्या प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विजय आनंदराव पवार (वय-50 रा. संभाजीनगर, त्रिमुर्ती कॉलनी, सांगली) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचे नाव आहे. सांगली एसीबीच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि.27) टिंबर एरिया येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालयात केली.
याबाबत तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदाराच्या कंपनीकडून फायर फायटिंग सिस्टम बसविण्याची कामे केली जातात. अशाच एका कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात पवार याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर कंपनीकडून करण्यात येणाऱ्या पुढील कामाचे दाखले देणार नाही असेही पवार याने तक्रारदार यांना सांगितले होते. तडजोडी अंती सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता विजय पवार याने दीड लाख रुपयांची मागणी करत तडजोडी अंती सव्वा लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी टिंबर एरिया येथील अग्नीशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची सव्वा लाखांची रक्कम स्विकारताना विजय पवार याला रंगेहाथ पकडण्यात आले. पवार याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे , पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अजित पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रविंद्र धुमाळ यांच्या पथकाने केली.