आमदार हसन मुश्रीफ यांच्या भावपूर्ण सत्कारामुळे गहिवरले व्हन्नूरकर ग्रामस्थ ; युवराज शिंदे यांच्या कुटुंबाला रुग्णसेवेतून मिळालेल्या जीवदानाबद्दल हृदयस्पर्शी सत्कार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
व्हन्नूर ता. कागल येथील शिंदे कुटुंबीयांनी केलेल्या भावपूर्ण सत्कारामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह उपस्थित व्हन्नूरकर ग्रामस्थही गहिवरले. आमदार श्री. मुश्रीफ यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून संपूर्ण शिंदे कुटुंबाला जीवदान दिल्यामुळे त्यांचा हा हृदयस्पर्शी सत्कार झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, व्हन्नूर ता. कागल येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि उद्घाटन कार्यक्रमासाठी आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. जाहीर सभेत युवराज रामचंद्र शिंदे यांच्या कुटुंबाने श्री. मुश्रीफ यांचा सत्कार केला.
चर्मकार समाजाचे असलेले युवराज कणेरीच्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक आहेत. उदरनिर्वाहासाठी एक गुंठासुद्धा जमीन नाही. पंधरा बाय वीस फुटांचे कौलारू घर, एवढीच जंगम मालमत्ता. पत्नी साै. उषा , प्रतीक्षा व प्राची या दोन मुली आणि मुलगा प्रथमेश या कुटुंबीयांसमवेत या कौलारू घरात रहातात. तीन वर्षांपूर्वी निधन झालेल्या आई कै. श्रीमती शेवंता रामचंद्र शिंदे यांना छातीत कॅन्सर झाल्यामुळे १३ वर्षांपूर्वी १५ लाखाची मोफत शस्त्रक्रिया मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये केली होती.
पाच वर्षापूर्वी पत्नी सौ. उषा (वय- ३८) यांच्यावर दोन्हीही कृत्रिम खुब्यांची शत्रक्रिया मुंबईच्या भाटिया रुग्णालयात झाली, याचा खर्च १२ लाख रुपये होता. सातवीत शिकणारा मुलगा प्रथमेशवर चार वर्षांपूर्वी पाच लाख रुपये खर्चाची पायाच्या गाठीची शस्त्रक्रिया भाटिया रुग्णालयातच केली आहे. ३२ लाख खर्चाचे हे उपचार आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून अगदी मोफत झाले. यासाठी कै. रघुनाथ मोरे, नेताजी मोरे यांची मोलाची मदत झाली.
आमदार श्री. यांच्या कृतज्ञतेप्रती श्री. शिंदे यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. मृत्यूनंतर देहदानच काय; जिवंतपणीसुद्धा आमदार श्री. मुश्रीफ यांच्यासाठी जीव देण्यात सार्थ अभिमान आणि धन्यता वाटेल, असेही ते म्हणाले.
हसनसाहेब मुश्रीफ म्हणजे वडाचे झाड…….
शिंदे कुटुंबीयांनी आमदार श्री. मुश्रीफ यांना वडाचे रोपटे भेट देवून सत्कार केला. हा संदर्भ देत युवराज शिंदे म्हणाले, गोरगरिबांचे आशीर्वाद आणि पुण्याईच्या जोरावर वडाच्या झाडाप्रमाणे आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे नेतृत्व घडलेले आहे. या झाडाची मुळे जनतेच्या हृदयापर्यंत खोलवर रुजलेली आहेत. त्यांची नाळ बहुजन समाजाशी घट्ट जुळलेली आहे.