ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रशेखर राव महाराष्ट्रात ; दिल्लीत पक्षाला खिंडार ; ६०० वाहनांच्या ताफ्यासह ‘बीआरएस’चे शक्तिप्रदर्शन

तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी तब्बल सहाशे गाडय़ांच्या ताफ्यासह सोमवारी पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकीकडे तेलंगणचे सगळे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात आले असताना दिल्लीमध्ये मात्र त्यांच्या पक्षाला खिंडार पडले. एक माजी खासदार, १२ माजी मंत्र्यांसह पक्षाच्या ३५ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राव यांना धक्का दिला.

पुढील सहा महिन्यांमध्ये (नोव्हेंबर-डिसेंबर) तेलंगणमध्ये होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आणि पाठोपाठ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राव यांनी पक्षाच्या विस्ताराचे धोरण आखले आहे. त्यांनी महाराष्ट्रावर आपले लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह आषाढी वारीनिमित्त ते सोमवारी सोलापुरात दाखल झाले. वाजतगाजत, पुष्पवर्षांवात त्यांचे स्वागत जंगी करण्यात आले. त्यांच्यासोबत पक्षाचे आमदार-खासदार व प्रमुख नेते एक बस आणि तब्बल सहाशे मोटारींमधून आले. तेलुगू भाषकांची लोकसंख्या जास्त असलेल्या सोलापूर पूर्व भागात पक्षाचे गुलाबी ध्वज, पताका आणि राव यांच्या प्रतिमा झळकविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या दौऱ्यामध्ये सरकोली येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात राव मार्गदर्शन करणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

व्हीआयपी’ दर्शनास विरोध

दरम्यान, पंढरपुरात येणाऱ्या केसीआर व त्यांच्या मंत्रिमंडळाला व्हीआयपी दर्शनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेना संघटनेने केली आहे. लाखो वारकरी दर्शनाची आस घेऊन अनेक तास ऊन, वारा, पावसात ताटकळत असताना केसीआर व त्यांच्या मंत्रिमंडळाला विठ्ठल दर्शन घडविणे वारकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

दिल्लीत पक्षाला धक्का

एकीकडे हे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू असतानाच दिल्लीत राव यांच्या पक्षाला मोठे खिंडार पडले. त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत एक माजी खासदार, १२ माजी मंत्री आणि ३५ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांनी माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव, माजी आमदार पन्याम व्यंकटेश्वरलू, कोरम कनकैया, कोटा राम बाबू, आमदार नरसा रेड्डी यांचे पुत्र राकेश रेड्डी आदींना काँग्रेस सदस्यत्व बहाल केले.

तेलंगणामध्ये ‘भारत राष्ट्र समिती’ची प्रमुख लढाई काँग्रेसशी असून हा पक्ष भाजपचा ‘ब’ चमू बनलेला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नुकसान करण्यासाठी ‘भारत राष्ट्र समिती’ विस्तार करत आहे. चंद्रशेखर राव यांनी हे पाऊल भाजपच्या राजकीय रणनीतीनुसारच टाकले आहे.

माणिकराव ठाकरे, तेलंगण प्रभारी, काँग्रेस

आज पांडुरंगाचे दर्शन राव यांच्यासोबत आलेल्यांसाठी सोलापुरातील विविध हॉटेलांमध्ये २२५ खोल्यांची सोय करण्यात आली आहे. रात्रीच्या मुक्कामानंतर आज, मंगळवारी सकाळी राव आपल्या लवाजम्यासह पंढरपूरकडे रवाना होतील आणि विठ्ठल मंदिरात पूजा करतील. पंढरपूरहून परत येताना तुळजाभवानी मंदिरातही केसीआर दर्शन घेणार आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks