पंढरपूर : मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन ; इतर नेत्यांना दर्शन रांगेत उभे राहून घ्यावे लागणार दर्शन

आपल्या मोठ्या लवाजम्यासह पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी फक्त के. चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार असून त्याच्यासोबत आलेल्या इतर मंत्री, आमदार, खासदारांना सोडण्यात येणार नसल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आषाढी वारी सुरू असल्याने व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या ६०० गाड्याच्या ताफ्यासह आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. हे सगळेजण मंगळवारी सकाळी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन घेणार आहेत. चंद्रशेखर यांच्या सोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, त्यांच्या सर्व आमदार आणि खासदार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. या सर्वांना व्हीआयपी दर्शन देता येणे शक्य होणार नाही, असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी हे शेकडो किलोमीटर चालून विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. अशावेळी व्हीआयपी दर्शनामुळे त्यांच्या दर्शनामध्ये खोळंबा होतो. त्यामुळे यंदापासून व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच आता केवळ तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन देण्यात येणार असून आमदार आणि खासदार तसेच मंत्र्यांना सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शन घ्यावे लागणार आहे. राजशिष्टाचारानुसार एखादा राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्री येत असताना त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणे गरजेचे असते. मात्र केवळ राजकारणापोटी केसीआर यांच्या सहका-यांना व्हीआयपी परवानगी नाकारण्यात आली आहे, असा आरोप बीआरएस पक्षाकडून करण्यात येत आहे.



