भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मोजणीचे हद्द कायम नकाशे व इतर संबंधित कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालयातून प्राप्त करण्यासाठी अर्ज केल्यानंतर शासकीय फिस वगळता 1 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेणार्या मुख्यालय सहाय्यकास अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द अंबाजोगाई शहर पोलिस स्टशेनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
मुबारक बशिर शेख (57, पद – मुख्यालय सहाय्यक, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, अंबाजोगाई. रा. प्रकाश नगर, लातुर) असे लाच घेणार्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांची बर्दापुर येथील शेतजमीन गट क्र. 532, 533 ची कायदेशीर फिस भरुन मोजनी करुन घेतली होती . सदर मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथुन प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता.
मुबारक बशिर शेख यांनी शासकीय फिस वगळता 1000 रुपयाची तक्रारदार यांचेकडे मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन बीड येथे तक्रार दिली . त्यावरुन सापळा कारवाई केली असता शेख यांनी तक्रारदार यांचेकडे 1000 रुपयाची मागणी केली व पंचा समक्ष 1000 रूपये त्यांचे कक्षात तक्रारदार यांचेकडुन स्विकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे ,अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक शंकर शिंदे , पोलिस अंमलदार सुरेश सांगळे,भरत गारदे, संतोष राठोड आणि नामदेव ऊगले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे