स्वप्नील लोणकरच्या रूपाने महाराष्ट्र एका उद्योन्मुख अधिका-यास मुकला : राजे समरजितसिंह घाटगे; लोणकर कुटुंबियांची भेट घेऊन दिला आधार

कोल्हापूर प्रतिनिधी :
राज्य सरकारच्या अनास्थेमुळे स्वप्नील लोणकरच्या रूपाने महाराष्ट्र एका उद्योन्मुख अधिका-यास मुकला आहे.असे भावपुर्ण उदगार राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले.
फुरसुंगी येथे लोणकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीवेळी ते बोलत होते.
यावेळी स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांना श्री.घाटगे यांनी मिठी मारली आणि घाटगे यांच्या खांद्यावर डोके ठेवून लोणकर यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी स्वप्नीलची आई छाया,वयोवृद्ध आजीबाई सुमन बहिण पूजा,मामा अभिजीत या संपुर्ण कुटुंबियांसह उपस्थितांचे डोळे भरून आले.
यावेळी श्री घाटगे म्हणाले, स्वप्नील हुशार होते. त्यांचा पिंड समाजसेवेचा होता.त्यांनी स्थापन केलेल्या पंचमुखी फाउंडेशन या सेवाभावी सःस्थेचे काम त्यांचे स्मरण म्हणून त्यांच्या पश्चात अव्याहतपणे चालू ठेवून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करूया. मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व तरुणांनी नोकरी या केवळ एकमेव पर्यायाचा विचार न करता व्यवसायाचा सुद्धा विचार करावा. अशा तरुणांचा पाठीशी राजकीय गटतट बाजूला ठेवून राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून ठामपणे उभा राहणार आहे.
यावेळी डबडबलेले डोळे आणि दाटलेल्या आलेल्या कंठात कातर स्वरात आपल्या भावना व्यक्त करताना स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर म्हणाले, अशा तरुण मुलांकडे आम्ही आई वडील उतारवयातील आधार म्हणून पाहत असतो. या मुलांच्या बरोबर आम्हीही काही स्वप्ने पाहिलेली असतात. याचा विचार करून तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. अशी मी तमाम तरूणांना हात जोडून विनंती करतो. अशा भावना व्यक्त केल्या.
स्वप्नीलची आई छाया यांनी सरकार आणखी किती स्वप्नील गमावण्याची वाट बघत आहे.असा खडा सवाल उपस्थित करून सरकारने अशा स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना ठोस धोरणातून शब्द द्यावा. अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाऊ म्हणून मी ठामपणे उभा राहणार
यावेळी श्री घाटगे यांनी लोणकर कुटुंबीयांचा आत्ता एकमेव आधार असलेल्या पूजाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. शासकीय पातळीवर काय मदत होते याची थोडे दिवस वाट बघूया.त्यानंतर काहीही न झाल्यास मला भाऊ म्हणून केव्हाही फोन करा. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा आहे. असा दिलासा लोणकर कुटुंबियासह पूजाला दिला.