जप्त केलेला ट्रक सोडवण्यासाठी 35 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

जप्त केलेला ट्रक सोडवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून 35 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदार व खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.6) ओम नागपुर ट्रान्सपोर्ट, हिरावाडी, नाशिक येथे केली.
रवींद्र बाळासाहेब मल्ले (वय- 39 पद- पोलीस हवालदार, नेमणूक नाशिक तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत विल्होळी पोलीस चौकी, नाशिक ग्रामीण), खाजगी इसम तरुण मोहन तोडी (वय-43 रा. जाजुवाडी हिमालय बँकेसमोर, इंद्रकुंड पंचवटी, नाशिक) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 47 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसबीकडे तक्रार केली आहे.
पोलिसांनी तक्रारदार यांचा ट्रक जप्त करुन विल्होळी पोलीस चौकी येथे जमा केला आहे. जमा केलेला ट्रक सोडवण्यासाठी पोलीस हवालदार रविंद्र मल्ले याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 70 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
नाशिक एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, पोलीस हवालदार रविंद्र मल्ले यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 70 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी 35 हजार रुपयांचा पहिला हप्ता खासगी व्यक्ती तरुण तोडी याच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने सापळा रचून तरुण तोडी याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीने पोलीस हवालदार रविंद्र मल्ले व तरुण तोडी यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी , वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील , पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रफुल्ल माळी, प्रमोद चव्हाण, विनोद चौधरी, संजय ठाकरे यांच्या पथकाने केली.