एआयसारखे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून ऊसाची उत्पादकता वाढवा- राजे समरजितसिंह घाटगे ; नानीबाई चिखलीत ‘शाहू’तर्फे एआय वापराबाबत चर्चासत्र उत्साहात संप्पन्न

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वाढत्या उत्पादन खर्चामुळे किफायतशीर ऊस शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. एआयच्या साहाय्याने ऊस लागवडीपासून ते उत्पादन, तोडणी आणि वाहतुकीपर्यंत अनेक टप्प्यांवर कार्यक्षम नियोजन करता येते. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी एआयसारखे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून ऊसाची उत्पादकता वाढवावी.”असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
नानीबाई चिखली (ता. कागल) येथे श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ‘ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्रावेळी ते बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले,शाहू उद्योग समुहाचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्यासह ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान सर्वप्रथम शाहू साखर कारखान्यात वापरण्यास नेहमीच प्राधान्य दिले. संशोधन केंद्रातील अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. याचेच पुढचे पाऊल म्हणून आम्ही एआय तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहन देत आहोत.हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी कारखान्याकडे आजअखेर शहाऐंशी शेतकऱ्यांनी दोनशे एकरहून अधिक क्षेत्राची नोंदणी केली आहे. अजूनही ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी कारखान्याकडे नोंदणी करावी.
ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील म्हणाले,ऊस शेतीत एआयच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज घेऊन पाणी व्यवस्थापन करता येते.मातीतील पोषणतत्वांची कमतरता ओळखून योग्य खतांचा वापर करता येतो,पिकावर येणाऱ्या रोगराईचा वेळीच अंदाज घेऊन उपाययोजना करता येते,ड्रोन व सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना रिअल टाइम डेटा उपलब्ध होतो. चर्चा सत्रानंतर शेतकऱ्यांनी प्रश्न व शंका मांडल्या.त्यावर तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,राजे बँकेचे संचालक एम.पी. पाटील, संजय चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.