निपाणी- मुधाळतिठ्ठा रस्ता वाहतुकीसाठी खुला ; पूर ओसरला

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारपासून विश्रांती घेतल्याने वेदगंगा नदीचे महापुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे निपाणी – मुधाळतिठ्ठा रस्त्यावर मुरगूड आणि शिंदेवाडी जवळ आलेले पुराचे पाणी पूर्णपणे उतरले आहे. गुरुवारी सायंकाळपासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर आल्यामुळे अमावास्या यात्रेनिमित्त आदमापूर मंदिराकडे येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला.
वेदगंगा नदीचे पाणी मुरगूड-निढोरी दरम्यान आल्याने त्याचबरोबरशिंदेवाडी-यमगे दरम्यान आल्याने निपाणी- मुधाळतिठ्ठा या महामार्गावरील सर्वच वाहतूक ठप्प झाली होती.. मुरगूडच्या बाजारपेठेवर याचा परिणाम झाला होता. पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उसंत घेतल्याने पुराचे पाणी झपाट्याने उतरले आहे. गुरुवारी सकाळी शिंदेवाडी-यमगे दरम्यानचे पाणी कमी झाले आणि दुपारपासून मुरगुड-निढोरी दरम्यानचे पाणीही झपाट्याने उतरू लागले होते. सायंकाळी ६ वाजता याठिकाणी अर्धा फूट पाणी शिल्लक होते. त्यातून वाहतूक सुरू होती.
आज आणि उद्या अमावास्या यात्रेनिमित्त बाळूमामा मंदिराकडे कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतात. या भाविकांनाही पाणी उतरल्याने दिलासा मिळाला आहे.