मुरगूड येथील सरपिराजीराव तलाव उड्डाणपूल संदर्भात अधिकाऱ्यांकडून पाहणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीनंतर मिळालेल्या आदेशानुसार मंगळवारी संबधित अधिकाऱ्यांनी तलाव सांडवा व वाहतूक मार्गाची पाहणी केली. यासंदर्भात नियोजित पूल आराखडा लवकरच सादर करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
मुरगूड शहराला प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्याचा वेढा पडतो व बेटाचे स्वरूप येते अशावेळी गडहिंग्लज निपाणी व कोल्हापूरकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग तलावाच्या सांडव्याच्या मार्गावरून जातो; पण सांडव्यातूनही पाणी मोठ्याप्रमाणात येत असल्याने हा मार्ग बंद राहतो. त्यामुळे उड्नुणपूल होणे ही काळाची गरज बनली आहे.
रस्ते महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. सी. मोगले व मुख्य अभियंता नायकवडी, ठेकेदार कंपनीचे पर्यवेक्षक सतीश चौगले यांनी भेट दिली व पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, दिग्विजयसिंह पाटील, नामदेव भराडे, सामाजिक कार्यकर्त संदीप भारमल, नंदकिशोर खराडे, जगन्नाथ पुजारी, संजय मोरबाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.