‘शाहू’ च्या चित्रकला स्पर्धेत सहा हजारहून अधिक बालचित्रकारांनी रेखाटले भावविश्व ; राजे विक्रमसिंहजी घाटगे जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत सहा हजारहून अधिक बालचित्रकारांनी भावविश्व रेखाटले. सलग चोविसाव्या वर्षी आयोजित या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व छत्रपती शाहू कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली.कागल येथे श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल,मुरगूड येथे मुरगूड विद्यालय सेनापती कापशी येथे न्यायमूर्ती रानडे विद्यालय व कणेरी (ता.करवीर)येथे काडसिद्धेश्वर विद्यालय अशा चार ठिकाणी एकाचवेळी स्पर्धा झाल्या.
पहिली ते तिसरी,चौथी ते पाचवी,सहावी ते सातवी,आठवी ते दहावी,मूकबधिर (पहिली ते चौथी) व मतिमंद विद्यार्थी अशा सहा स्वतंत्र गटांत स्पर्धा पार पडल्या.परीक्षक म्हणून रावसाहेब शेंडे,राहुल सुतार,राहुल गवंडी आणि दिग्विजय मोरे यांनी काम पाहिले.
‘शाहू’चे संचालक रमेश माळी म्हणाले,छत्रपती शाहू महाराज यांचा कलेला प्रोत्साहन देण्याचा वारसा स्व.राजेसाहेब यांनी कृतीतून चालाविला.त्यांच्या पश्चात कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा. या उद्देशाने या स्पर्धा अखंडितपणे होत आहेत. ग्रामीण भागातील सर्वात मोठी ही स्पर्धा आहे.या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे व छत्रपती शाहू महाराज यांच्या कागलचे नाव उज्वल करावे.
यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, “स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त २००२ पासून या चित्रकला स्पर्धा सुरु करण्यात आल्या. सुरुवातीला केवळ कागल येथे होत असलेल्या या स्पर्धा आता विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मागणीनुसार चार ठिकाणी होऊ लागल्या असून, यामुळे बालचित्रकारांना आपली कला सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळत आहे.
यावेळी शाहूचे संचालक सचिन मगदूम , सतीश पाटील ,भाऊसाहेब कांबळे ,प्रशासन अधिकारी एम.व्ही.वेस्वीकर , मुख्याध्यापक एस.डी. खोत , मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण आदी उपस्थित होते.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा व स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांनी केले.जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले.एच.आर मॕनेजर बाजीराव पाटील यांनी आभार मानले.