मुरगुडमध्ये पत्रकार भवन उभारणीला लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ; पत्रकार भवन बांधकाम शुभारंभ संपन्न

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहर पत्रकार संघाच्या बहुप्रतिक्षित पत्रकार भवन बांधकामाचा शुभारंभ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार भवन उभारणीला दानशूर लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शिंदे होते.
लोकवर्गणीतून हे पत्रकार भवन उभारण्यात येत आहे. पत्रकार भवन उभारणीसाठी बहुमोल सहकार्याबद्दल प्रशासक आतिश वाळुंज व अभियंता सागर भोसले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. येत्या चार महिन्यात सर्व सोयीनी युक्त पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शिंदे यांनी दिली. पत्रकार भवन उभारणी कामाच्या निर्धाराबद्दल
मुख्याधिकारी वाळुंज यांनी संघाचे कौतुक केले. यावेळी संतोष भोसले व विजय मोरबाळे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. महादेव कानकेकर यांनी केले. उपाध्यक्ष राजू चव्हाण यांनी आभार मानले.