कागल तालुक्यातील केनवडे येथे चिमुकलीचा गोबर गॅसच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील केनवडे येथील दिड वर्षाची चिमुकली स्वरा पंकज पाटील हिचा घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबरगॅसच्या खड्ड्यात पडून दुदैवी मृत्यू झाला. सदरची घटना मंगळवार (ता.१७) रोजी सकाळी घडली. चिमुकल्या स्वराच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी गावाच्या पश्चिमेला केनवडे- सावर्डे खुर्द रोडवर पंकज पाटील यांचे घर आहे. सकाळी पंकज पाटील यांची दीड वर्षाची चिमुकली स्वरा हिला शौचालयाला झाले. तिच्या आजीने स्वराला शौचालयाला बसवले आणि शौचालय झालेनंतर तिच्या शरीराची स्वच्छता केली. त्यानंतर तिला घरात जायला सांगितले. मात्र स्वरा घरात न जाता खेळत घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्याजवळ गेल्याचे कोणाचेही लक्षात आले नाही.
आजीसह घरातील सर्वजण कामात व्यस्त होते. घरातील सर्वांना स्वरा ही नेहमीप्रमाणे आजोबा सोबत गावात गेली असेल या समजून तिची चौकशी केली नाही. काही वेळानंतर स्वराचे आजोबा घरी आल्यानंतर त्यांनी चिमुकलीची चौकशी केली. त्यावेळी घरातल्यांनी तुमच्या सोबतच स्वरा आली असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी आपल्या सोबत नसल्याचे सांगताच कुटुंबियांची धावपळ उडाली. स्वराची शोधाशोध केली असता तीचा मृतदेह गोबर गॅसच्या खड्ड्यामध्ये सापडला.घरातील लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. स्थानिक डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी तिला दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पहिला वाढदिवस… दुदैवी घटना
स्वराच्या आई-वडिलांनी फोडलेल्या हंबरड्याने हृदय पिळवून टाकणारा होता. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काही महिन्यापूर्वीच पंकज पाटील यांनी एकुलत्या स्वराचा पहिला वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला होता.