म्हाकवेतील नाथ केसरीचा कौतुक डाफळे मानकरी ; श्री हालसिध्दनाथ भंडाऱ्यानिमित्त मैदानाचे आयोजन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
म्हाकवे ता. कागल येथील ग्रामदैवत श्री हालसिध्दनाथांच्या भंडाऱ्यानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मल्ल कौतुक डाफळे विरुद्ध अमोल बुचडे कुस्ती अकॅडमी पुणेचा मल्ल समीर देसाई यांच्यात झाली. अर्धा तास चाललेल्या या कुस्तीत प्रेक्षकांना डाव-प्रतिडाव पाहायला मिळाले.
वजनाने व उंचीने दोन्ही मल्ल समान होते. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या समीर देसाई यांने कौतुक डाफळेवर कब्जा मिळवत चितपट करण्याचा प्रयत्न केला. अतिशय सीताफीने कौतुकने सुटका करून घेत समीर देसाईवर एकेरी पट काढत कब्जा घेतला. पंधराव्या मिनिटाला कौतुकने घुटना डावावर समीरला चिटपट करण्याचा प्रयत्न केला पण अत्यंत चपळाईने समीरने सुटका करून घेतली. अतिशय आक्रमक चाललेले या कुस्तीत समीर देसाईच्या उजव्या पायाला लिगामेंटची दुखापत झाल्याने त्याने मैदानातून माघार घेत कौतुक डाफळेला विजयी घोषित करण्याचे आवाहन केले.
विजयी उमेदवार कौतुक डाफळे याला पुणे येथील उद्योजक राजाराम पाटील म्हाकवेकर यांच्या हस्ते चांदीची गदा रोख रक्कमेचे बक्षीस देण्यात आले. मैदानास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीतसिंह घाटगे, वीरेन घाटगे यांनी उपस्थिती लावली. यावेळी उपसरपंच अजित माळी, धनंजय पाटील, नितिन पाटील, जी.एस. पाटील, उद्योजक अनिल चौगुले, शिवानंद माळी, विजय पाटील अमित पाटील, राहूल पाटील, सतिश भरवसे उपस्थित होते.
द्वितीय क्रमांकाच्या दोन कुस्त्या झाल्या. मुरगुड येथील मंडलिक आखाड्याचा मल्ल रोहन रंडे विरुद्ध बारामती येथील नवनाथ कुस्ती केंद्राचा मल्ल अंगद बुलबुले यांच्यात झाली. अतिशय आक्रमक खेळ करत रोहन रंडे यांने अवघ्या पाचव्या मिनिटालाच घिस्सा डावावर अंगद बुलबुले याला चिटपट करत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली.
दुसरी कुस्ती मोतीबाग तालमीचा मल्ल अरुण बोंगार्डे विरुद्ध सांगली येथील राष्ट्रकुल कुस्ती संकुलचा मल्ल अभिजीत मोर यांच्यात झाली.ताकतीने समान असणाऱ्या दोन्ही मल्लांनी डाव-प्रतिडाव केले. बोंगार्डे याने एकरीपट काढण्याचा प्रयत्न केला. तो सिताफीने मोर याने परतावून लावला. अभिजीत मोर यांने दुहेरीपट काढत अरुण बोंगार्डे याला चितपट करण्याचा प्रयत्न केला पण तोही असफल झाला. अरुण बोंगाडे यांनी अभिजीत मोरच्या मानेचा कस काढत त्याला घुटना डावावर चितपट केले.
तृतीय क्रमांकाच्या दोन लढती झाल्या. बानगे येथील मल्ल ऋषिकेश पाटील विरुद्ध कुंभी कासारी कुस्ती संकुलचा मल्ल भगतसिंग खोत यांच्यात झाली. भगतसिंग वजनाने मोठा होता तर ऋषिकेश उंचीने अधिक होता. दोघांनीही ताकतीचा अंदाज घेत पाचव्या मिनिटाला ऋषिकेशने दुहेरी पट काढण्याच्या प्रयत्नात भगतसिंगवर कब्जा घेतला. मानेचा कस काढत कोंदे एकच्याक डाव मारण्याचा प्रयत्न ऋषिकेशचा असफल झाला. कब्जा मिळवलेल्या ऋषिकेशने बैठ्या स्थितीतील कोंदे एकच्याक डावावरती भगतसिंग खोतला आसमान दाखविले.
तृतीय क्रमांकची दुसरी कुस्ती बारामतीच्या नवनाथ कुस्ती केंद्राचा मल्ल शंकर माने विरुद्ध मोहन पाटील यांच्यात झाली. सुरुवातीपासूनच आक्रमक झालेल्या कुस्तीत मोहन पाटील यांने घटना डावावरती शंकर माने याला चिटपट करत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली.
मैदानातील अन्य विजयी मल्ल असे हर्षवर्धन माळी, सोहम कुंभार, सुशांत पाटील,समीर पाटील, संचित येजरे, प्रेम पवार, तेजस माळी (म्हाकवे), हर्षवर्धन एकशिंगे (केनवडे), अतुल डावरे, प्रशांत मांगोरे (बानगे), सौरभ पाटील, निलेश हिरुगडे, विनायक वास्कर (शाहू साखर), आकाश कापडे (आनूर), प्रथमेश कोळपे, राहुल टकले (बारामती), आर्यन पाटील (राशिवडे), रियाज किल्लेदार (मत्तीवडे), समर्थ पाटील (सावर्डे), पारस माने (पिंपळगाव).
मैदानातील विजयी महिला मल्ल असे आसावरी गंगाधरे, आदिती कपडे, विभावरी पाटील, राधिका ढेरे, वेदिका कुंभार, मधुरा खंदारे.
मैदानात लहान-मोठ्या शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. पंच म्हणून बाळासो मेटकर, दत्तात्रय एकशिंगे, भारत दंडवते, रघुनाथ पाटील, आनंदा पाटील, वैभव तेली, तुकाराम चोपडे, बाळासो रोड्डे, ज्ञानदेव पाटील, शंकर भोपळे यांनी काम पाहिले. मैदानाची निवेदन राजाराम चौगुले यांनी केले. मैदानाचे संयोजन शिवाजीनगर येथील युवकांनी केले.
चर्चा देणगीची……
उद्योजक राजाराम पाटील पुणेकर यांनी कुस्ती मैदानासाठी ६५ हजार रुपयांची देणगी दिली होती तर मैदानातील विजेत्या मल्लांना ३२ हजार रुपयांची उत्स्फूर्त देणगी दिली. त्यांच्या या देणगीची चर्चा होती. विशेष म्हणजे त्यांनी हलगी वादक निवेदक तसेच अन्य घटकांनाही उत्स्फूर्त देणगी देत आपले दातृत्व दाखवले.