बाळूमामा भंडारा उत्सवाचे नेटके नियोजन ; १५ लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आदमापूर येथील श्री बाळूमामा भंडारा उत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. देवस्थान समितीच्या कार्याध्यक्षा रागिनी खडके यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या उत्सवाचे अत्यंत शिस्तबद्ध असे नियोजन केले होते.
यामध्ये वाहतूक व्यवस्था ,वाहनतळ, पाणीपुरवठा, निवास व्यवस्था ,व्यापारी व छोटे दुकानदार यांचे व्यवस्थापन सुद्धा उत्तम पद्धतीने करण्यात आले होते.
महत्त्वाचे म्हणजे श्रींच्या दर्शनाची व्यवस्था करताना भक्तांना कोणत्याही गैरसोयीला तोंड द्यावे लागू नये म्हणून सर्व स्वयंसेवक श्रद्धेने व आपुलकीने काम करताना दिसले.
श्रींच्या महाप्रसादासाठी विशाल मंडप उभा करण्यात आला होता. महाप्रसादाला गहू ,डाळी तांदूळ ,साखर पालेभाज्या असे सव्वीस टन धान्य जमा झाले होते.
अनेक स्वयंसेवकांनी शिस्तीने प्रसाद वाढण्याचे ही काम केले.त्यानंतरची स्वच्छता देखील केली.
महाराष्ट्र ,कर्नाटक तेलंगणा व आसपासच्या राज्यातून आलेल्या १५ लाखाहून अधिक भाविकांनी श्री बाळूमामा भंडारा उत्सवाचा आनंद लुटला.
रागिनी खडके यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या समितीला अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले, सचिव संदीप मगदूम, सरपंच विजय गुरव यांनीही मोलाचे सहकार्य केले. एकंदरीत लाखो भाविकांच्या उपस्थितीने हा प्रचंड उत्सव न भूतो असा ठरला.