नेतृत्वगुण विकासासाठी अभिमत विद्यार्थी संसद उपयुक्त – प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांचे प्रतिपादन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
‘अभिमत विद्यार्थी संसद’ विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मत मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी व्यक्त केले. ते मंडलिक महाविद्यालयाच्या ‘राज्यशास्त्र विभागा’मार्फत आयोजित ३१ व्या ‘अभिमत विद्यार्थी संसद’ या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. तसेच ‘अभिमत विद्यार्थी संसद’ हे राज्यशास्त्र विभागाचे वेगळेपण असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्पहार अर्पण करून संसदेच्या कामकाजाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.पांडुरंग सारंग, प्रा.डॉ.एम.ए.कोळी उपस्थित होते. दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये ‘अभिमत विद्यार्थी संसद’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
सदर अभिमत संसदेमध्ये देशातील तसेच राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा घडवून आणण्यात आली. देशातील वाढती बेरोजगारी, वाढती महागाई अशा ज्वलंत प्रश्नांवर संसदेच्या कामकाजा दरम्यान गदारोळ झाला. एकंदरीत गोंधळाच्या वातावरणात संसदेतील प्रश्नोत्तराचा तास पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डी.व्ही.गोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुशांत पाटील यांनी केले तर आभार प्रा. विश्वनाथ चौगले यांनी मानले. यावेळी प्रा.डॉ.माणिक पाटील, प्रा.तानाजी सातपुते, प्रा. धनाजी खतकर, प्रा. संजय हेरवाडे, प्रा.एच.एम.सोहनी, प्रा. दादासाहेब सरदेसाई, प्रा.राहुल बोटे, प्रा.गुरुनाथ सामंत प्रा.दिपाली सामंत, प्रशासकीय कर्मचारी सुमित जाधव, सतिश खराडे, सुनिल कडाकणे तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.