ताज्या बातम्यामहाराष्ट्र

३०० वाहनांचा ताफा, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी ; तेलंगणाचे सर्व मंत्रिमंडळ घेऊन मुख्यमंत्री केसीआर घेणार पांडुरंगाचं दर्शन

राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समिती वेगाने पुढे येत आहे. अनेक पक्षाचे मातब्बर नेते, माजी आमदार यांची बीआरएसमध्ये प्रवेश देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. सुरुवातीला मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केलेल्या केसीआर यांनी आता हळूहळू राज्याच्या विविध कोपऱ्यात पाय रोवण्याची तयारी केली आहे. त्यात पंढरपूर आषाढी वारीनिमित्त केसीआर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जातेय.

येत्या २७ जून रोजी तेलंगणाचे सर्व मंत्रिमंडळ घेऊन मुख्यमंत्री केसीआर हे पंढरपुरच्या पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. अब की बार किसान सरकार हा नारा देत केसीआर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हाक दिली आहे. पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी आषाढी वारीनिमित्त एकत्र येतात. याच संधीचा फायदा घेत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने पंढरपुरात शक्तीप्रदर्शन करण्याचं ठरवले आहे. तब्बल ३०० वाहनांचा ताफा घेऊन केसीआर पंढरपुरात दाखल होतील. त्यानंतर त्यांच्याकडून माऊली ज्ञानोबा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

BRS काँग्रेसला त्रास देण्यासाठी महाराष्ट्रात – राष्ट्रवादी

कुठल्याही परिस्थितीत केसीआर यांना काँग्रेसला त्रास द्यायचा आहे. तेलंगणात काँग्रेस आणि केसीआर यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे. तेलंगणाचा वचपा मी महाराष्ट्रात काढेन या भावनेतून बीआरएस राज्यात येतेय. त्यांचा कुठलाही ग्राऊंड नाही. बीआरएसला फार काही मते मिळतील असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर BRS चे स्वागत केले पाहिजे. एकीकडे आघाडीकडून वारकऱ्यांवर टीका केली जाते. या लोकांनी दखल घेतली नाही परंतु BRS ने कमीत कमी दखल घेतली. निश्चितच काँग्रेस राष्ट्रवादीला बीआरएसचा फटका बसणार आहे असं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.

दरम्यान, पंढरपूरला सगळ्यांचे स्वागत आहे. फक्त राजकारणासाठी कुणीही येऊ नये. भक्तीभावाने त्याठिकाणी आले पाहिजे. भक्तीभावाने कुणी येत असेल तर त्याठिकाणी त्यांचे स्वागत आहे असं प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्यावर दिली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks