युनियन बँकेच्या मुरगूड शाखेचा ३० मार्चला शुभारंभ ; ग्राहकांना दर्जेदार सेवा देणार : संदिप डवंग

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
देशभरात सुमारे ९ हजार ३०० शाखातून सेवा देणाऱ्या राष्ट्रीयकृत युनियन बँकेच्या मुरगूड शाखेचा शुभारंभ ३० मार्चला होत असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे सिनीअर मॅनेजर संदिप डवंग व शाखाधिकारी अमोल मोरे यांनी दिली.
मुरगूड शहरात बँक ऑफ इंडिया च्या रूपाने खूप पूर्वीपासून राष्ट्रीयकृत बँकेची सेवा ग्राहकांना मिळते. पण या ठिकाणचे व्यवहार वाढल्याने सातत्याने ग्राहकांकडून दुसऱ्या बँकेची मागणी होत होती. त्यास अनुसरून युनियन बँकेच्या प्रशासनाने वर्षभरापासून सर्व्हेक्षण करून शहरात शाखा काढण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळेच १ एप्रिल पासून बँकेची सेवा ग्राहकांना मिळणार आहे.
रविवारी ३० मार्चला सकाळी ११ वा. युनियन बँकेच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख व डी.एम.जी . संजय कुमार मंडल यांच्या हस्ते मुरगूड शाखेचा शुभारंभ व उद्घाटन होत आहे. मुरगूड परिसरातील व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक , सरकारी कर्मचारी , राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे अशी विनंती सिनीअर मॅनेजर डवंग यांनी केली आहे. यावेळी पी.जी. चौगले, सुनिल मंडलिक, अविनाश चौगले उपस्थित होते.