आदमापूर येथे बाळूमामांच्या भंडारा उत्सवाची तयारी पूर्ण

मुरगूड निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्री क्षेत्र आदमापूर येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सद्गुरू बाळुमामांच्या भंडारा यात्रेला बुधवार (ता. २६) प्रारंभ होणार आहे .त्यानिमित्ताने रथ मिरवणूक, मुख्य पालखी सोहळा,गुरुमाऊली कृष्णात डोणे (वाघापूर)यांची भाकणूक व महाप्रसादासाठी लाखो भाविक येतील. यात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मंदिर समिती कार्याध्यक्षा रागिनी खडके यांनी पत्रकारांना दिली. यंदाचा पालखी सोहळा साउंड सिस्टीम मुक्त होईल.कडक उन्हापासून त्रास होऊ नये, महाप्रसादाचा लाभ व्यवस्थित घेता यावा यासाठी भव्य मंडप उभारला आहे. महाप्रसादावेळी भाविकांना पाण्याच्या बाटल्याही पुरविल्या जातील. रथ मिरवणूक व पालखी सोहळा शांततेत पार पडावा यासाठी नियमावली तयार केली असून, पालखी सोहळा यंदा साउंड सिस्टीममुक्त होईल.
यात्रेदरम्यान भाविकांना आरोग्याच्या दृष्टीने मोफत उपचाराची सोयही केली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी दोन मोठे तळ तयार केले आहेत. त्यामध्ये हजारो वाहने थांबतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.यात्रेत होणारी गर्दी लक्षात घेऊन नियमित टॉयलेट, स्वच्छता गृहाबरोबर जादा शौचालय व्हॅनची सोय आहे. यंदा दर्शन रांगेमध्ये बैठक व्यवस्थाही आहे. यावेळी सचिव संदीप मगदूम, सरपंच विजय गुरव, विश्वस्त शामराव होडगे उपस्थित होते.
यात्रा शांततेत व सुरक्षितेत पार पाडण्यासाठी येणारे सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ, विविध संस्था, व्यावसायिक, व्यापारी, कर्मचारी तरुण मंडळे, विविध विभागांचे पदाधिकारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्याध्यक्षा रागिनी खडके यांनी केले.