वाठार : एकतर्फी प्रेमातून बळजबरी करत वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करुन गळा दाबून खून

एकतर्फी प्रेमातून बळजबरी करत वाठार येथील वीस वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संशयित सनी अरुण कांबळे (वय २५ रा.वाठार) याला पोलिसांनी अवघ्या काही तासांतच ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाठार येथील संशयित सनी कांबळे या तरुणाने एका तरुणीची ओळख काढून तिला वारंवार भेटण्यासाठी बोलवत होता. दि. ९ ऑक्टोबर रोजी ही पीडित तरुणी युवती रात्री आठच्या सुमारास घरी जात असताना संशयिताने तिला अडवले. मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत तिला रस्त्यापासून बाजूला नेले. त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला. यावेळी संशयिताने तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. या घटनेत पीडित तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडलेलं ठिकाण निर्जन असल्याने त्या ठिकाणी सहसा कुणी फिरकतही नाही. त्यामुळे हा खुनाचा प्रकार कुणाला कळाला नाही. रविवारी (दि. १५) संध्याकाळी एक शेतकरी वैरण आणण्यासाठी त्या भागात गेला असता त्याला काहीतरी कुजल्याचा वास आल्यानंतर जाऊन पाहिले असता युवतीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळला. ही बातमी वडगाव पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्याने पोलिसांनी घटनास्थळी रात्रभर बंदोबस्त ठेवला. याचवेळी पोलिसांनी खून झाल्याचे गृहीत धरून तपास सुरू केला.
पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, हवालदार रवि गायकवाड, महेश गायकवाड, मिलिंद टेळी,अजित पाटील, जितेंद्र पाटील आदींनी तपासाची चक्रे गतिमान करत संशयित सनी कांबळे याला काही तासांतच ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सनी कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर वडगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ओळखीतून त्याने पिडितेकडून चैनीसाठी वारंवार पैसे उकळ्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी (दि. १६) सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या खून प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करत आहेत.