तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी प्रतिशिर्डी, तर मूळ क्षेत्र मेतके प्रतिपंढरपूर होईल ; भंडारा उत्सवात नाथांची भाकणूक

निकाल न्यूज प्रतिनिधी :
भारत देशात समान नागरी कायदा येईल. महाराष्ट्र राज्यात नद्याजोड प्रकल्प येईल. जगाच्या तापमानात वाढ होईल. तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी प्रतिशिर्डी, तर मूळ क्षेत्र मेतके प्रतिपंढरपूर होईल, अशी भाकणूक मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथील सद्गुरू बाळूमामा व श्री हालसिद्धनाथ भंडारा उत्सवात करण्यात आली.
भगवान डोणे (वाघापुरे) यांनी ही भाकणूक केली. ही भाकणूक ऐकण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महिला राजकारणात मोठी बाजी मारतील. जात-धर्मात वैरत्व वाढेल. शर्यतीचा बसवा (बैल) माणसाला शाप देईल.
मराठा सैनिक छातीची ढाल करून लढेल. पाकिस्तानचा चौथाई भाग भारतात येईल. साखरसम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील. गुळाचा भाव वाढतच राहील. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल. उसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राजकारणाला कलाटणी मिळेल. पैशाच्या जोरावर न्याय मिळेल. महागाईचा भस्मासुर वाढेल. पाण्याचा कप विकत मिळेल.
पैसे, दागिने घातक ठरतील. चांदीचा दर वाढतच राहील. मरण स्वस्त होईल. खांद्यावरचा चाबूक खांद्यावर व हातातील भाकरी हातातच राहिल. तिसरे महायुद्ध होईल. मुस्लिम राष्ट्रांचा विध्वंस होईल. तिसरे महायुद्ध होईल. सीमाभागात मोठा गोंधळ उडेल. आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल, अशी भाकणूक करण्यात आली. डोणे यांना सुरके म्हणून संजय वाघमोडे व तुकाराम डोणे यांची साथ लाभली.