कोल्हापुर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये जयश्री जाधव यांना बिनविरोध करण्यास आपला विरोध नाही : मा.आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राजकारणापेक्षा माणुसकी महत्वाची आहे. त्यामुळे उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये जयश्री जाधव यांना बिनविरोध करण्यास आपला विरोध नाही. पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून पक्षप्रमुखांचा जो आदेश येईल तो मला मान्य असेल, असं वक्तव्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
सर्वच निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जात असतील तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा देखील योग्य सन्मान राखला पाहिजे, असेही माजी आमदार क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे. गोकुळची निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जात असेल तर महापालिकेची निवडणूक का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र गेली 10 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना याबाबत विचारले असता, 2019 मध्ये आपला थोड्या मतांनी पराभव झाला. तब्बल 76 हजार मते मला मिळाली. त्यामुळे जनतेचा कौल हा आपल्याच बाजूने आहे. मी आमदार असताना शहराच्या विकासासाठी अनेक कामे केली आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत संधी मिळाल्यास निश्चितच शहराच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. मात्र राजकारणापेक्षा माणुसकी देखील महत्वाची आहे. त्यामुळे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध करण्यास आपला विरोध नसल्याचही त्यांनी स्पष्ट केले.