दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 हजार रुपयेची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांच्या बाजूने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 5 हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस हवालादाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. उदलसिंग मानसिंग जारवाल (वय 53 रा. यशवंतनगर अंबड रोड जालना जि. जालना) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसीबीने ही कारवाई बुधवारी (दि.18) जालना शहरातील तालुका पोलीस ठाण्यात केली.
याप्रकरणी 28 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार याच्या विरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात आयपीसी 279, 323, 327, 337, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा तपास तक्रारदार यांचे बाजुने करुन लवकर दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार जारवाल यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी बुधवारी एसीबी कार्यालयात तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस हवालदार जारवाल यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस हवालदार जारवाल याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे , पोलीस अंमलदार गजानन घायवट, गजानन खरात, अतिश तिडके, गणेश बुजडे, गणेश चेके, जावेद शेख, संदीपान लहाने, चालक विठ्ठल कापसे यांच्या पथकाने केली.