समरजितसिंह घाटगेंना आमदार करण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभारणार : खास.धनंजय महाडिक ;कागल येथे भाजपाच्या संयुक्त मोर्चा संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. तसेच सध्याचा काळ भाजपासाठी सुवर्णकाळ आहे .हे पहाता येत्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा झेंडा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. असे आवाहन करून कागलमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांना आमदार करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
कागल येथील श्रीराम मंदिरमधील सभागृहात भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ वर्ष कार्यकाल पूर्ण झाल्याबद्दल आयोजित संयुक्त मोर्चा संमेलनवेळी ते बोलत होते..
श्री.महाडिक पूढे म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे. विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.सर्वसामान्यांच्या पर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ध्यास घेतलेल्या राजे समरजितसिंह घाटगे यांना आमदार करुनच या अभियानाची यशस्वीपणे सांगता करुया.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर प्रतिमा उंचावली आहे. समाजातील सर्व थरातील नागरिकांसाठी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. विशेषतः साखर कारखानदारीला त्यांच्यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या गतिमान योजना व लोकहिताची निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत भाजपचे कार्यकर्त्यांनी पोहोचवावेत. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा आतापर्यंत केवळ मतांसाठीच वापर केला आहे. त्यांच्या आरक्षणासाठी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार इंपिरीकल डेटा गोळा करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.मात्र भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर येताच कोर्टाच्या आदेशानुसार इंपिरीकल डेटा गोळा करून कोर्टात सादर केला.
सुरुवातीला भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे स्मृतीदिनानिमित्त पूजन केले.यावेळी तालुकाध्यक्ष संजय पाटील, यांचे सह भाजप पदाधिकारी तसेच विजया निंबाळकर, सुधा कदम, रेवती बरकाळे,उपस्थित होत्या .अमोल शिवई यांनी स्वागत, डाॕ.आनंद गुरव यांनी प्रास्ताविक केले. आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.
कागल मध्ये हाय व्होल्टेज मोठी …पण लढत सोपी
यावेळी खासदार महाडिक यांनी कागलमध्ये विधानसभेसाठी हाय व्होल्टेज मोठी लढत होईल. ही लढत मोठी वाटत असली तरी सोपी होणार आहे. मात्र ती कशी हे आपण आत्ताच सांगणार नाही. असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.