स्वसंरक्षणासाठी महिलांनी स्वतः व मुलीनाही खंबीर बनवावे : सौ नवोदिता घाटगे ; जिजाऊ जयंती निमित्त प्रात्यक्षिकातून दिले स्वसंरक्षणाचे धडे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महिलांनी स्वसंरक्षणासाठी इतरांवर अवलंबून राहू नये.कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वतःसह मुलीनाही खंबीर बनवावे.असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमवेळी त्या बोलत होत्या.
येथील श्रीराम मंदिर मधील सभागृहात राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.
सौ घाटगे पुढे म्हणाल्या, कोणत्याही वयाच्या महिलांवर संकटकालीन परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे आमचे वय झाले आहे आता आम्हाला स्वसंरक्षणाच्या माहितीची काय आवश्यकता नाही. अशी याबाबत असलेली अनस्था महिलांनी टाळून प्राथमिक माहिती घ्यावी. तर आपल्या मुलींना याबाबतीत संपूर्ण माहिती द्यावी. त्यासाठी स्वतंत्र माहिती व प्रशिक्षण देणाऱ्या यंत्रणेचा उपयोग करावा. विपरीत परिस्थितीत घाबरून न जाता खंबीरपणे महिलांनी सामोरे जावे.
महिलांसाठी स्वसंरक्षणार्थ मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाचे आयोजनही केले होते. वेशभूषा स्पर्धेत अनुक्रमे अहिल्या मिसाळ,किरण कोराणे, सानिका हळभावे, श्रावणी बरकाळे, सविता पाटील या विजेत्या ठरल्या.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.विजयश्री निंबाळकर यांनी स्वागत केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले.