ईव्हीएम’ला दोष देण्यात काहीच अर्थ नाही : अभिनेता कलम हसन यांनी टोचले मित्र पक्षांचे कान

“आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ( ईव्हीएम)ला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. तसा दोष देऊ नये. कारण एखाद्या कारला अपघात झाला तर त्याला कार नाही तर ड्रायव्हर जबाबदार असतो. या निवडणुकीनंतर आम्हाला ‘ईव्हीएम’चा निर्णय घ्यायचा आहे. लोकांना मतदान यंत्र कसे असावे याबाबत सांगायचे आहे, अशा शब्दांमध्ये मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षाचे प्रमुख आणि प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेते कलम हसन ‘इंडिया’ आघाडीतील मित्र पक्षांचे आज (दि 24 मार्च) कान टोचले.
तामिळनाडूमध्ये आज एका सभेत बोलताना कमल हसन म्हणाले की, आज आपण ‘ईव्हीएम’ला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कारण एखाद्या कारला अपघात झाला तर या अपघातासाठी कारला जबाबदार धरता येत नाही. तर त्यासाठी ड्रायव्हर जबाबदार असतो. त्याप्रमाणेच आता आपल्या लोकसभा निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’चा निर्णय घ्यायचा आहे. ते कसे असावे, याची माहिती लोकांना सांगावी लागणार आहे. रामानेही अग्निपरीक्षा घेतली, होती बरोबर ना?, असा सवाल करत, आम्ही या ईव्हीएम मशीनही शुद्धता तपासू, असेही त्यांनी सांगितले.
कमल हसन यांनी तामिळनाडूत इंडिया आघाडीतील मित्र पक्ष द्रमुकला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असेही जाहीर केले आहे. कलम हसन यांच्या पक्षाला द्रमुक 2025 च्या राज्यसभा निवडणुकीसाठी एक जागा देणार आहे. कमल हसन आणि एम के स्टॅलिन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, आगामी लाेकसभा निवडणुकीत कमल हसन हे तामिळनाडू आणि एकमेव पुद्दुचेरी प्रदेशातील 39 लोकसभा मतदारसंघात द्रमुकच्या प्रचाराचे काम करणार आहेत.