शाहूवाडी तालुक्यातील शिंपे येथे वन्यप्राण्याची बेकायदा शिकार केल्याप्रकरणी तिघांना अटक

शाहूवाडी तालुक्यातील शिंपे येथे वन्यप्राण्याची बेकायदा शिकार केल्याप्रकरणी संशयित तिघांना वन विभागाने रंगेहाथ पकडले. बाबासो आकाराम पाटील (रा. शिंपे), बाळासो धोंडिबा कुंभार, सुहास शामराव पाटील (दोघेही रा. सावे, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पथकाने संशयितांच्या घरातून रानडुकराचे मांस, शिकारीसाठी वापरलेली ठासणीची सिंगल बोअर बंदूक, सहा छरे, 3 मोबाईल संच व अन्य साहित्य जप्त केले आहे. संशयितांना
शाहूवाडी-मलकापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. मोबाईल संच पडताळणीमध्ये अवैध शिकारीबाबत महत्त्वाची माहिती आढळली आहे. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती परिक्षेत्र वनाधिकारी अमित भोसले यांनी दिली.
दरम्यान, जंगल हद्द व परिसरातील अवैध शिकारींना आळा बसावा म्हणून निगराणीसाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. शिवाय, रात्र गस्ती पथक विशेष ड्रोन कॅमेर्यासह तैनात करण्यात आले आहे.
कारवाईत भोसले यांच्या नेतृत्वाखाली परिमंडल वनाधिकारी मेहबूब नायकवडी, वनरक्षक आशिष पाटील व वन कर्मचार्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.