कोल्हापुर ऑरगॅनिक फार्मस प्रोड्युसर कंपनीच्या ५ संचालकांकडून ५८ लाख ३० हजाराचा अपहार ; SMARTच्या नोडल आधिकाऱ्यांकडून मुरगूड पोलिसात फिर्याद

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापुर ऑरगॅनिक फार्मस प्रोड्युसर कंपनीच्या पाच संचालकाने 58 लाख 30000 रुपयाचा अपहार केल्याची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री नोंद झाली. जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, कोल्हापूरचे नोडल अधिकारी प्रविण आनंदा आवटे यांनी संबंधीत ५ संचालकांविरोधात फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र शासनाकडुन राबविण्यात येणा-या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पामधुन आरोपी नं 1 ते 5 हे संचालक असलेल्या कोल्हापुर ऑरगॅनिक फार्मस प्रोड्युसर कंपनी लि. करड्याळ, ता. कागल, जि कोल्हापुर या कंपनीस ” सोयाबीन संकलन, प्रक्रिया व खरेदीदारास विक्री करणे “या कामासाठी हस्तातरित केलेले एकुण 68 लाख 30 हजार रुपये अनुदान हे कंपनीचे संचालक विलास कल्लाप्पा सरनाईक, रा. प्रॉपर्टी क्र 201, करड्याळ, ता कागल, जि कोल्हापुर, सौ. बिना बापूसाहेब माळी, रा तळमजला, भुषण अपार्टमेंट, राजारामपुरी 6 वी गल्ली, कोल्हापुर, प्रशांत विठ्ठलराव घाटगे रा. गांधीनगर, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली, उदय दत्तात्रय गोखले रा.501, सी, आनंद प्रॉस्पेरा, अंबाई टैंक रोड, रंकाळा पश्चिम बाजू, कोल्हापूर, सौ. प्रज्ञा माणिक ढाले रा. खोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या ५ जणांनी स्मार्ट कार्यालयाची पुर्व परवागी न घेता 30/12/2022 ते आज रोजीपर्यत वेळोवेळी प्रकल्पाशी संबंधीत नसलेल्या घटकांना वितरीत करून नियमाप्रमाणे प्रकल्प पूर्ण न करता एकूण अनुदानापैकी केवळ १० लाखाची रक्कम परत देवून उर्वरीत ५८ लाख ३० हजार रुपये परत न करता सदर रकमेचा अपहार करून शासनाची फसवणुक केली. याबाबत नोडल आधिका-यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.स कलम 420,406,409,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक करे करीत आहेत.