धक्कादायक : उडपीतील महाविद्यालयात मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून व्हिडीओ रेकॉर्डिंग, तीन मुली आणि प्रशासनाविरोधात गुन्हा

कर्नाटकातील उडपी शहरात असलेल्या पॅरामेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उडपीच्या पॅरामेडिकल गर्ल्स कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तीन विद्यार्थ्यांशिवाय कॉलेज प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालपे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये शबनाज, अल्फिया आणि अलिमा या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत.
मुलींच्या टॉयलेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 509, 204, 175, 34 आणि आयटी कायद्याच्या कलम 66 (E) अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये कॉलेज प्रशासनालाही आरोपी करण्यात आले आहे.
‘नेत्र ज्योती इन्स्टिट्यूट ऑफ अलाइड हेल्थ सायन्सेस’ या कॉलेजच्या शौचालयातील व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या संदर्भात पोलिसांनी स्वत:हून दखल घेऊन दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थिनीचा खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर तो डिलिट केल्याप्रकरणील तीन विद्यार्थिनी आणि कॉलेज प्रशासनाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पीडितेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या घटनेशी संबंधित माहिती आणि पुरावे देण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलिसांनी प्रशासनावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कॉलेज प्रशासनाने तीनही आरोपी विद्यार्थिनींना निलंबित केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाला आता राजकीय रंगही आला आहे. या मुलींना अटक करावी या अशी मागणी भाजपने केली आहे.