ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक : साताऱ्याजवळ गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नवी मुंबई येथून गावी निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा साताऱ्याजवळ भीषण अपघात झाला. तवेरा गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असून यामध्ये कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी सातच्या सुमारास सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ झाला. तवेरा गाडी कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती.

निखिल श्रीकांत सव्वाखंडे (वय 30), प्रियांका निखिल सव्वाखंडे (वय- 25), शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे (63, सर्व रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) अशी अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील लोकांची नावे आहेत. तर दोघा जखमींवर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सव्वाखंडे कुटुंबीय तवेरा गाडीतून जयसिंगपूरला जात होते.साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात तवेरा गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे तवेरा गाडीची समोरील बोलेरो पीकअप टेम्पोला जोरात धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सव्वाखंडे यांच्या मुंबईतील एका नातेवाईकाचे नुकतेच निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी तवेरा गाडीतून मुंबईला गेले होते.शुक्रवारी रात्री जयसिंगपूरकडे परत येत असताना साताऱ्या जवळ आज सकाळी हा अपघात झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये तवेरा गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks