सिंधुदुर्गात सहलीसाठी आलेल्या 4 विद्यार्थीनी बुडाल्या, देवगड समुद्र किनाऱ्यावरील घटना

सिंधुदुर्गात सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच जण हे समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्गातील देवगड समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे. बुडालेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये चार मुली तर एका मुलाचा समावेश आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी सिंधुदुर्गातील देवगड येथे सहलीसाठी आले होते. दुपारच्या सुमारास विद्यार्थी हे समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र, या पैकी पाच जण हे समुद्रात बुडाले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी बुडाल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील खासगी सैनिक अकॅडमीचे एकूण 35 विद्यार्थी हे सिंधुदुर्गातील देवगड येथे सहलीसाठी आले होते. पाच जणांपैकी चार जणांचे मृतदेह हातील लागले असून एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे आणि राम डिचवलकर अशी बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं बोललं जात आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज नसणे आणि त्यात मोठ-मोठ्या लाटा यामध्ये पर्यटक अडकून जातात. परिणामी पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागतात.
विद्यार्थी बुडाल्याची माहिती मिळताच बचाव आणि शोधकार्य तातडीने हाती घेण्यात आले. मात्र, यापैकी चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा अद्यापही शोध सुरू आहे. विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील सैनिक अकॅडमीचे 35 विद्यार्थी देवगड येथे सहलीसाठी आले होते. देवगड समुद्र किनाऱ्यावर दाखल होताच विद्यार्थ्यांना पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी समुद्राच्या पाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुर्दैवाने या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी बुडाले. पाच विद्यार्थ्यांपैकी प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे या चार मुलींचे मृतदेह हाती लागले आहेत. तर राम डिचोलकर या विद्यार्थ्याचा शोध अद्यापही सुरू आहे.