पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र ; आगामी निवडणुकीमध्ये मनसेला मोठा धक्का

आज सोशल मिडीयावर पोस्ट करत वसंत मोरे यांनी (mns) राजीनामा दिला आहे, त्यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीमध्ये मनसेला मोठा धक्का बसणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. ते वारंवारं आपली नाराजी देखील व्यक्त करत असे.
अशातच, आज सकाळी त्यांनी फेसबुक वरून पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
सकाळी केली होती ही पोस्ट
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट
एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो…
त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो…”
अशी पोस्ट (mns) मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून ते काही वेगळा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया
मी लवकरच माझी भूमिका जाहीर करेन. अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. पक्षातील काही नेत्यांकडून त्रास होत होता.
वसंत मोरे यांचे राजीनामा पत्र
प्रति,
मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.
आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!
पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.