१४ गोवंशांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यांवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने गगनबावडा पोलिसांकडून कारवाई ; पाच आरोपींना अटक

कळे -वार्ताहर : अनिल सुतार
गगनबावडा तालुक्यातील तळये खुर्द येथे दि ७ रोजी पहाटे सहा वाजता तळये ते बोरबेट रोडवर १४ गोवंशांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर गगनबावडा पोलिसांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने कारवाई करण्यात येऊन पाच आरोपींना पकडण्यात यश आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातून कर्नाटकाकडे बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी घेऊन जाणारी १४ गोवंश गगनबावडा तालुक्यातील तळये- बोरबेट रस्त्यावर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पांडुरंग पडवळ वय ३० रा. मांडूकली ता. गगनबावडा यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते व ट्रस्टच्या सदस्यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून १४ गोवंशांची तस्करी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी गोवंश असणाऱ्या तीन गाड्या पैकी दोन गाड्या तसेच तस्करी करणाऱ्यांना गगनबावडा पोलिसांच्या मदतीने पकडण्यात कार्यकर्त्यांना यश आले. तर एक गाडी कार्यकर्त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत निघून गेली मात्र रात्री उशिरा त्या गाडीचा गगनबावडा पोलिसांकडून पाठलाग करत पकडण्यात आली.
यावेळी मंगेश पडवळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कायद्यानुसार महंमदइरफान रहीमबकास सिराज वय ३४, आपताफ सादिक सिराज वय २४, आसिफमहम्मद इसाक सिराज वय ४३ सर्व राहणार आमराई गल्ली आजरा ता. आजरा, आरमान सलीम दरवाजकर वय २५ वाडा गल्ली आजरा ता. आजरा ,तबरेज चॉंदमिया ठाकूर राहणार सौंदळ/ परटवली ता. राजापूर जिल्हा रत्नागिरी या पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी महिंद्रा पीकअप एम.एच०९ एफ.एल २५६०, महिंद्रा पीकअप के.ए ४८-९२४७ व रेनॉल्ड क्वीड कार एम.एच१४ जी.ए -१७१० ही वाहने मिळुन ९३ हजार रुपये किमतीची १४ गोवंश त्यामध्ये दोन गाई व बारा बैल मिळून एकूण ८,४३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुढील तपास गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील करत आहेत.