गोरगरिबांचे काम म्हणजे ईश्वरी सेवा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; कागलमध्ये निराधारांना अनुदान मंजुरी पत्रांचे वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गोरगरिबांचे काम म्हणजे साक्षात ईश्वरी सेवाच होय. या भावनेने आणि तळमळीतूनच गोरगरिबांसाठी काम करत राहिलो, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राजकीय जीवनाच्या सुरुवातीला सभापती आपल्या दारी, आमदार आपल्या दारी, पुढे मंत्री आपल्या दारी अशा संपर्क दौऱ्यामध्ये गावोगावी गेल्यानंतर निराधारांच्या हालअपेष्टा मी जवळून बघितल्या. त्यामुळेच काहीही झाले तरी त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणायचे या इराद्याने काम करीत राहिलो, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये वृद्ध, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या व तृतीयपंथी अशा ३२५ लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी पत्राचे वाटप पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने होते.
भाषणात पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल तालुका संजय निराधार गांधी निराधार समितीचे काम अत्यंत उत्कृष्ट आहे. १९८० साली तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी निराधारांसाठी सुरू केलेल्या या योजनेचे सुरुवातीला मासिक साठ रुपये अनुदान होते. त्यानंतर १८० रुपये, दोनशे रुपये, सहाशे रुपये असे करीत ते दीड हजार करण्यात यश मिळाले. कोणत्याही परिस्थितीत लवकरच निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन दीड हजारावरून दोन हजार करण्यासाठी, उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकात्वाची वयाची अट ६५ वरून ६० करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच; अनाथांना पेन्शन आणि सुधार गृहातील मुलींना लग्न होईपर्यंत पेन्शन सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, गोरगरीब आणि अनाथांच्या कल्याणाच्या तळमळीतूनच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या खात्याला न्याय दिला. गोरगरिबांच्या सेवेसाठी त्यांनी या आधीच्या मंत्रिमंडळात आणि आत्ता विशेष सहाय्य हे खाते मागून घेतले. समाजाप्रतीच्या तळमळीतूनच त्यांनी या कामकाजात अमुलाग्र बदल केले.
यावेळी नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुरेखा डवर, राजेंद्र माने, सदाशिव तुकान, माजी सभापती पुनम महाडिक – मगदूम, राजू आमते, साताप्पा कांबळे, ॲड. सुधीर सावर्डेकर, नामदेव आंगज, बाबुराव घडमोडे, अंकुश पाटील, धनाजी तोरस्कर, परीट मॅडम, अमित पिष्टे, संजय ठाणेकर, इरफान मुजावर, दिपक गंगाई आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार बस्तवडेचे माजी सरपंच साताप्पा कांबळे यांनी मानले.