कामगारांमुळेच बिद्रीची भरारी : बाबासाहेब पाटील ; कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

बिद्री ता. ९ ( प्रतिनिधी : अक्षय घोडके )
बिद्री साखर कारखान्याच्या उभारणीत व प्रगतीत सभासदांसह कामगारांचाही सिंहाचा वाटा आहे.बिद्रीची चिमणी अखंडपणे तेवत राहिली तरच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता येईल, असे मत बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
कुर ( ता. भुदरगड ) येथे बिद्री साखर कारखाना सेवानिवृत्त कर्मचारी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. अध्यस्थानी आनंदराव आबिटकर होते.
पाटील पुढे म्हणाले की, सद्या काळम्मावाडी धरणातून अनेकजण पाण्याच्या पळवापळवीचा प्रयत्न करत आहेत. ज्या धरणासाठी अनेक भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या त्यांनी यासाठी कष्ट, संघर्षाबरोबरच प्रसंगी तुरुंगवास देखील भोगला. त्यामुळे प्रथम त्या भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचे पाणी दिले पाहिजे.
यावेळी माजी कार्यकारी संचालक के. डी. गोसावी, एल. के. काळे-पाटील, जी. आर. किल्लेदार, आर. वाय. जगदाळे, वाय. एस. पाटील, विश्वास पाटील, आनंदराव आस्वले, शामराव मोरे आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक माजी जि. प. सदस्य भूषण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन एम. एम. चौगले यांनी केले तर आभार विश्वास पाटील यांनी मानले.
युवकांच्या उत्कर्षासाठी कारखानदारी !
कारखानदारी ही राजकारणाचा अड्डा नसून या माध्यमातून अनेक तरुण युवा उद्योजक, शेतकरी घडविण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भावाबरोबर शेतीला पाणी देण्यासाठी कारखानादारीचा वापर झाला पाहिजे, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले