कागलमधील “शिवनोकरी महामेळाव्यात” २१४६ जणांची नोंदणी ; ७३५ जणांना जाग्यावरच नोकरीची नियुक्तीपत्रे ; राष्ट्रवादी काँग्रेस व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे आयोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलमध्ये आयोजित केलेल्या “शिवनोकरी महामेळाव्यामध्ये” नोकरीसाठी इच्छुक असलेल्या दीड हजारावर तरुणांनी नाव नोंदणी करून सहभाग घेतला. यामधून शैक्षणिक पात्रता व अंतिम मुलाखतीनंतर ४०० जणांना जाग्यावरच नियुक्तीपत्रे देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने या महामेळाव्याचे आयोजन केले होते. या महामेळाव्यामध्ये ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स अशा विविध क्षेत्रातील विविध नामवंत ८५ कंपन्यांनी सहभाग घेतला.
डी. आर. माने महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने “शिनोकरी महामेळाव्याची” सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. पुण्यातील जीआरबी कंपनीच्या सहकार्याने या महामेळाव्याचे आयोजन केले होते.
भाषणात पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या 30-35 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये बेरोजगारी हटवून रोजगार, नोकऱ्या, उद्योग -व्यवसाय उभारणीला चालना दिली. गरजवंत बेरोजगार युवक-युवतींच्या हाताला रोजगार ही संकल्पना घेऊन या शिवनोकरी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्यामध्ये नियुक्ती होऊन नोकरीसाठी बाहेर जावे लागणाऱ्या तरुणांना लागेल त्या पद्धतीचे सहकार्य करू.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बेरोजगार युवक युतीसाठी विविध क्षेत्रातील नोकऱ्यांची ही संधी साक्षात आपल्या दरवाजापर्यंत आणून दिली आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आजपर्यंत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध सहकारी संस्था आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्यांमध्ये हजारो युवक- युवतींना रोजगार मिळवून दिला आहे.
स्वागत नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले. प्रास्ताविक जीआरबी सोल्युशन कंपनीचे संचालक गुरुदेव गवंडी यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील – कुरूकलीकर यांनी मानले.
उपस्थितांना झुणका- भाकर, लस्सी आणि चहा -नाष्टाही…….!
उपस्थित सर्वच युवक- युवतींसाठी नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने झुणका -भाकर व लस्सीचे वितरण करण्यात आले. तसेच; संध्याकाळी सर्वांना चहा नाश्ताही देण्यात आला. फाउंडेशनच्या या सौजन्याने उपस्थित सुखावले.