दिल्लीच्या सीमेवर विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक ; शेतकरी-पोलिसांमध्ये रात्रभर धुमश्चक्री

किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर, ट्रक घेऊन दिल्लीच्या वेशीवर धडकले आहेत. देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंडीगडमध्ये केंद्र सरकारने चर्चा केली. परंतु, चर्चेच्या पहि्या फेरीत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. तसेच या शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहे. पंजाब-हरियाणाचे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत जाण्यावर शेतकरी ठाम आहेत. मात्र शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा दिल्लीच्या सीमांवर तैनात करण्यात आला आहे. रात्रभर पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री(Clash) पाहायला मिळाली.
दिल्लीच्या तिन्ही सीमा सील करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्तेमार्ग बंद केल्याने मिळेत त्या रस्त्याने शेतकरी दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. काल हरियाणा-पंजाबला जोडणाऱ्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, बॅरिकेड्सही तोडले.
पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. यादरम्यान 100 हून अधिक शेतकरी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यातही घेतले आहे. रात्रभर हा गोंधळ सुरूच होता. शेतकरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहिले, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्री देखील अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या
शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा गोंधळ पाहता हरियाणा सरकारने १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू केले आहे. तसेच इंटरनेट सेवा देखील १५ फेब्रुवारीपर्यंत बंद केली आहे. हरियाणा, दिल्लीची सिंघू-टिकरी सीमा आणि उत्तर प्रदेशची गाझीपूर सीमा सील करण्यात आली आहे. दिल्लीत पुढील ३० दिवस कलम १४४ लागू राहणार आहे. पंजाबमध्येही इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.