कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघात घेणार रोजगार व दिव्यांग आरोग्य मेळावे ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय करणार नियोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघात रोजगार व दिव्यांग आरोग्य मेळाव्यांचे नियोजन करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शिवनोकरी महामेळावा” या रोजगार मेळाव्यातून बेरोजगार युवक -युवतींना विविध आस्थापनांमध्ये नोकरीची संधी मिळेल तर दिव्यांग आरोग्य मेळाव्यातून दिव्यांग व कर्णबधिरांना उपकरणे व आरोग्य सेवा मिळतील, असेही ते म्हणाले.
या दोन्हीही व्यापक मेळाव्यांच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
भाषणात पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, “शिवनोकरी महामेळावा” या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बारावीपासून पदवी व पदव्युत्तर युवक- युवतींना नोकरीची संधी मिळेल. गरजूंसाठी शैक्षणिक व अनुषंगिक कागदपत्रे, मुलाखत तयारी, व्यक्तिमत्व विकास, बारकावे, आवडीनिवडीनुसार नोकऱ्या हे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच; हॉटेल व्यवस्थापन, औद्योगिक, बँक, महिंद्रा, टाटा, एलआयसी, भारत गियर, पेटीएम यासारख्या पन्नासहून अधिक कंपन्यांचे एच. आर. प्रतिनिधी उपस्थित असतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने ही सुविधा दिली जाईल.
दिव्यांग आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना कृत्रिम हात, पाय, तीनचाकी सायकल, काठी, व्हीलचेअर, वॉकर, कमी ऐकू येणाऱ्यांसाठी श्रवणयंत्रे तसेच; अनुषंगिक आरोग्य सुविधा पुरविल्या जातील.
जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय अनुक्रमे रोजगार व दिव्यांग आरोग्य मेळाव्यांच्या तारखा अशा…..
गडहिंग्लज १४ व २३: गडहिंग्लज शहर, कडगांव- गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघ. कागल १५ व २१: कागल शहर, सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघ व कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदार संघ. मुरगुड १६ व २२: मुरगुड शहर, बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघ, नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघ व सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघ. उत्तुर १७ व २४: संपूर्ण उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघ. या विभागीय मेळाव्यांमधून रोजगार मेळाव्याच्या तयारीचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच; दिव्यांग नागरिकांसाठी लागणाऱ्या कृत्रिम अवयव व उपकरणांची मोजमापे घेतली जातील. त्यानंतर कागलमध्ये मुख्य रोजगार मेळावा रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी होईल. दिव्यांग आरोग्य मेळाव्याची तारीखही लवकरच निश्चित होईल.