ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वितरणात केडीसीसी बँक अग्रेसर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये केडीसीसी बँक अग्रणी आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये युवकांना रोजगार निर्मितीसाठी कर्ज मंजुरीपत्र वितरण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच बेरोजगार तरुण-तरुणंच्या हाताला रोजगार देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्यासाठी बँक नेहमीच कार्यरत आहे. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तरुण-तरुणींनी रोजगार निर्मितीमधून आर्थिक सक्षम व्हावे.

यावेळी प्रशांत शंकर कुदळे- उंदरवाडी, सौरभ यशवंत पाटील- बेलवळे बुद्रुक, सतीश गणपती नलवडे- कौलगे, आण्णासो तात्यासो वाणी- सुळकूड, रणजीत वसंत पाटील- उंदरवाडी, राजेंद्र गुंडू पाटील- कौलगे, सौरभ नरहरी कुलकर्णी – कागल, संदीप विकास रेपे – चौंडाळ, प्रवीण दत्तात्रय पाटील- सावर्डे बुद्रुक, अमोल आनंदा परबकर – कासारी यांना नवीन व्यवसाय व उद्योग धंद्यातून रोजगार निर्मितीसाठी केडीसीसी बँकेने अर्थसहाय्य केले. त्या मंजुरीपत्रांचे वाटप मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

ब्राह्मण युवकालाही रोजगार निर्मितीसाठी अर्थसहाय्य…..!

संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, मराठा समाजातील बेरोजगार तरुण तरुणींच्या हाताला रोजगार देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आहे. त्याअंतर्गत मराठा समाजातील युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी केडीसीसी बँक नेहमीच अग्रभागी आहे. तसेच; या महामंडळाच्यावतीने सौरभ नरहरी कुलकर्णी- रा. कागल या ब्राह्मण युवकालाही रोजगार निर्मितीसाठी बँकेने अर्थसहाय्य केले आहे. मराठा समाजासह सर्वच समाजांच्या रोजगार निर्मितीतून आर्थिक उन्नतीसाठी बँक सदैव कटिबंध आहे.

यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष अशोकराव जकाते, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजय चितारी आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. आभार विभागीय अधिकारी शंकरराव निंबाळकर यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks