म्हासुर्ली येथील सरपंच, उपसरपंच एकाचवेळी अपात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या इतिहासातील पहिलीच घटना.

कळे -वार्ताहर अनिल सुतार
धामणीखोऱ्यातील म्हासुर्ली ता . राधानगरी येथील ग्रामपंचायत सरपंच मीनाताई भीमराव कांबळे यांना मासिक सभा घेण्याच्या बाबतीत कसूर केल्याच्या कारणावरून तर उपसरपंच शबाना नौशाद मुल्लाणी यांना ग्रामपंचायतीच्या सेवेत आर्थिक हितसंबंध जोपासल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे.याबाबतची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे यांनी केली होती. एकाच वेळी दोन्ही पदे अपात्र होण्याची कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून येथील गावगाडा चालणार कसा हा प्रश्न येथील नागरिकांना निर्माण झाला आहे .
येथील ग्रामपंचायतीची फेब्रुवारी 2021 साली पंचवार्षिक निवडणूक झाली होती यावेळी एकाच गटाचे सर्वच्या सर्व अकरा सदस्य निवडून आले होते. मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून कुरबुरी सुरू झाल्या आणि दोन गट पडले व त्यातूनच येथील कारभाराला ग्रहण लागले आणि एकमेकांवर तक्रारी सुरू झाल्या.
गतवर्षी गायरानामध्ये अतिक्रमण केल्याची तक्रार तात्कालीन ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे यांच्यावर झाली होती ती सिद्ध झाल्याने ते अपात्र ठरले.या गोष्टींचा राग मनात धरून बाबुराव कांबळे हे सरपंच सौ कांबळे यांनी कोरोना काळात एप्रिल 2021 ची मासिक सभा न घेतल्याने कर्तव्यात कसूर केल्याची तर उपसरपंच शबाना मुल्लाणी यांचे पती नौशाद मुल्लाणी यांनी गाडी भाड्यापोटी रक्कम स्वीकारल्याने आर्थिक हित संबंध जोपासून वैयक्तिक आर्थिक लाभ प्राप्त केल्यामुळे त्यांना अपात्र करावे अशी मागणी अर्जदार बाबुराव कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या प्रकाराची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच व उपसरपंच यांना अपात्र केले असून सरपंच व उपसरपंच यांना पदासह सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे.
राजकारणात नेहमी हेवेदावे व वैयक्तिक सुडाच्या घटना नेहमी घडतात पण अशा पध्दतीने गावचे कारभारी एकाच वेळी अपात्र झाल्याने व घडलेल्या घटनेने या गावातील राजकारणात खळबळ उडाली असून आता म्हासुर्ली ग्रामपंचायतीत पुढे काय होणार?या घटनेची संपूर्ण धामणीखोऱ्यासह सर्वत्र चर्चा सुरू आहे.