कागल तालुक्यातील अवचितवाडी उपराळा तलावाने गाठला तळ

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अवचितवाडी, ता. कागल येथील उपराळा साठवण तलावातील (३१.८४ मी. (उंची) पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. चिमगाव- अवचितवाडी परिसरात शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून, ९० टक्के पेरण्याही पूर्ण झाल्या आहेत; मात्र आता शेतकरी चातकासारखी मान्सूनची वाट पाहात आहेत. आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास शेतात उभी असणारी पिके करपण्याचा धोका आहे.
खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या अथक प्रयत्नामुळे २००७ साली या तलावास प्रशासकीय मान्यता मिळाली. भूसंपादनाच्या कचाट्यात सापडलेल्या या तलावाचे काम २०१२ पर्यंत रखडले होते. अखेर अडचणीवर मात करत ८ कोटी ४२ लाखांचा निधी वापरून तलावाची उभारणी झाली. तलावाची उंची ३२ मी. असून ३०० मी. लांबीची धरणाची भिंत आहे. ५.३३ चौ.कि.मी. पाणलोट क्षेत्र आहे. तलावात ५१ एकर बुडीत क्षेत्र आहे, तर तलावात ४९.८९ दलघफू इतका पाणीसाठा होतो. उपराळा साठवण तलाव सलग सात वर्षे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहात आहे