बिद्रीच्या कारखान्याच्या आजच्या सुनावणीकडे कार्यक्षेत्राचे लक्ष

बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्वरीत घ्यावी; या मागणीसाठी सत्ताधारी गटाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज गुरुवार दि. २२ रोजी सुनावनी होत असून आजच्या सुनावणीकडे संपूर्ण कार्यक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
बिद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत आठ महिन्यांपूर्वी संपली असून निवडणूक प्राधिकरणाने निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली होती. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी पावसाचे कारण पुढे करीत ही निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याची राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
यावर निवडणूक प्राधिकरणाने ३० सप्टेंबरनंतरच बिद्री कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाविरोधात बिद्रीच्या सत्तारुढ संचालक मंडळाने कारखान्याची निवडणूक त्वरीत घेण्याचे आदेश द्यावेत यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होत असून आजच्या सुनावनीकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.