स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सव विशेष लेख : ‘व्यर्थ न हो हे बलिदान ‘ १३.१२.चा गारगोटी कचेरीवरील हल्ला

निवेदन : इतिहास अभ्यासक
एम.डी. रावण .
शब्दांकन :व्ही.आर.भोसले.
‘तेरा बारा’ हे शब्द गेली ऐंशी वर्षे
स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात गुंजी घालत आहेत.हुतात्मा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो .यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होतोय. त्या निमित्ताने तेरा बारा च्या हुतात्म्यांची माहिती नव्या पिढीला होणे आवश्यक आहे.ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्तिकरिता आपल्या आयुष्याचे बलिदान दिले त्यांच्या साठी एकमुखाने सारा देश म्हणतोय .
व्यर्थ न हो हे बलिदान .
नेमकं काय घडलं तेरा बारा ला .?
गांधीजींनी भारत छोडो चळवळ सुरू केली होती.या चळवळीचे लोन १९४२ साली देशभर पसरले होते.दीडशे वर्षांची इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकायची व देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे म्हणून हजारो देशभक्त पेटून उठले होते .
जागोजागी जाळपोळी सुरू झाल्या .सरकारी कचेऱ्यावर हल्ले करणे ,रेल्वे वहातुक बंद पाडणे, हत्यारे काबीज करणे ,इत्यादी मार्गाने ही चळवळ फोफावत गेली .
तत्कालीन करवीर संस्थानमधील या चळवळीचे नेतृत्व देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्याकडे होते .ते स्वतः भूमिगत राहून चळवळीचे नेतृत्व करत होते .
क्रांतिकारकांनी गारगोटीच्या कचेरीवरील हल्ल्याचे नियोजन केले होते .
तारीख ठरली होती १३:१२-१९४२.
करवीर वरून कोणतीही कुमक मिळू नये म्हणून कुर येथील वेदगंगेवरचा पूल डायनामाईटने उडवायचा असा क्रांतिकारकांचा डाव होता .या हल्ल्याचे नेतृत्व केले होते सेनापती कापशीचे प्रसिद्ध मल्ल करवीरय्या स्वामी यांनी.त्यांनी कोल्हापूरचे गोपाळ बकरे,आणुरचे माधवराव कुलकर्णी, मुरगूडचे ईश्वरा गोधडे, लक्ष्मण मेंडके ,कलनाकवाडीचे नारायण वारके, खडकलाट चे निजाम काझी,निपणीचे मानवी ,लक्ष्मण सुतार,नाझरे,संकेश्वरचे शंकरराव सारवाडे ,इत्यादी प्रमुख क्रांतिकारकांशी संपर्क साधला .तो ही अगदी गुप्त अशा टोपण नावांनी .
ठरले .
भीती ,संशय यांना रजेवर पाठवून क्रांतिकारक पाली येथील गुहेत जमले .
प्रथम कुर चा पूल डायनामाईटने उडवायचा ठरले .निजाम काझी यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले .11 डिसेंबर ला मध्यरात्री नंतर पुलाच्या दगडी कमानीला डायनामाईट बसवण्यात आला .अंधारात तो उलटा बसल्याने त्याचा स्फोट नदीच्या पाण्यात झाला .
पूल वाचला .
इकडे पालीच्या गुहेतील लोक अस्वस्थ झाले .तारीख पुढे ढकलूया म्हणत होते .स्वामीं नी मात्र निर्धार केला होता .त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना समजावले ,अन्नत्याग केला आणि अग्निसाक्ष शपथा झाल्या .
साठ जणांची एक तुकडी गारगोटीच्या इंजुबाईच्या देवळात तेरा बाराच्या मध्यरात्री जमली .रात्री २ पर्यंत ही संख्या ९० झाली .
अवघ्या अर्ध्या फर्लांगावर कचेरी .
मोहीम सुरू झाली .गेटवर कांबळे पोलिस होता .स्वामींनी त्याची बंदूक हिसकावली .तेवढ्यात कांबळेने पायानेच चाप दाबला व बंदुकीच्या गोळीने स्वामींच्या छात्तीचा वेध घेतला आणि ते खाली कोसळले.
नारायण वारके पोलिस लाईनला कड्या घालायलागेले होते पण कुत्र्यांच्च्या भुझकण्यामुळे ते परत फिरले.आणि कचेरीजवळ पोचले .स्वामींना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून रागाने त्यांनी कांबळेचा गळा दाबला .कांबळे चा श्वास गुडमरला .तेवढ्यात मरणोन्मुख अवस्थेतही स्वामींनी त्याला जीवदान देण्यासाठी आपल्या रक्ताची शपथ घातली.
“आपला लढा ब्रिटिशांविरुद्ध आहे .त्याच्या विरुद्ध नाही .”
केवढा हा त्याग !
त्यात ही ते म्हणत होते .
“मला तुरुंगातील रंजबंद्याना भेटवा .”
त्यांची ती शेवटची इच्छाही अपूर्ण राहिली .
तेवढ्यात कांहीजण आत घुसले आणि त्यांनी आतल्या पोलिसांना उघडे करून कोठडीच्या गजाना बांधून घातले .
त्यातून निसटलेल्या रामू यादव या पोलिसाने एक गोळी झाडली .तिने १८ वर्षाच्या तुकाराम भारमलचा बळी घेतला .
कांहीजण राजबंद्याना सोडवायला धावले तर कांहीजण खजिना फोडायला सरसावले .
राजबंद्यानी अशा परिस्थितीत बाहेर पडायला नकार दिला .
इकडे बाजारपेठेत वास्तव्यास असलेले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट शेट्टी यांना हल्ल्याची वर्दी गेली .
त्यांनी दुनळी बंदूक व गोळ्यांचा पट्टा देऊन बाबू जाधव या पोलिसाला गोळीबाराचा आदेश देऊन पाठवले .
बाबूने बंदुकीच्या नळीने खिडकीची काच फोडली .नळी आत सरकवून एकेकाच्या वेध घ्यायला सुरुवात केली .
कापशीचे शंकरराव इंगळे खजिन्याच्या कुलपावर घाव घालत होते .बाबूच्या गोळीने त्यांच्या छातीचा वेध घेतला . तेथेच त्यांनी प्राण सोडला .
ते भयंकर दृश्य पाहून एखादा प्राण वाचवण्यासाठी पळून गेला असता ,पण हे देशभक्त जीवावर उदार झाले होते .ते मागे सरकणारे नव्हते .
नानीबाई चिखलीचे मल्लू चौगले पुढे सरसावले .दोन घाव त्यांनी घातलें आणि बाबूच्या दुसऱ्या गोळीने त्यांनाही टिपले .
गोळी कोठून येते हे कळतच नव्हते .
एका पाठोपाठ एक याप्रमाणे जत्राटचे बळवंत जबडे,खडकलाटचे परशराम साळुंखे, कलनाकवाडीचे नारायण वारके ,खडकलाटचे निजाम काझी ,यांच्यावर बाबूने गोळ्या झाडल्या. काझी व वारके जबर जखमी झाले होते .बाबूने आणूरच्या माधवराव कुलकर्णी यांच्यावर बंदुक रोखली होती इतक्यात कागलच्या शिवराम मर्दाने यांना बाबूचा सुगावा लागला .मर्दाने खिडकीकडे धावले ,पण बाबूने पलायन केले .
क्रांतिकारकांची ती कलेवरे आणि जखमी झालेल्या काझी व वारके यांना तिथेच सोडून जाणे इतरांना खुप जड झाले होते पण आणखी किती बळी जातील याचा नेम नव्हता .
क्रांतिकारकांनी मोहीम आटोपती घेतली असली तरी ब्रिटिश सत्तेची खुर्ची खिळखिळी करण्यात यश आले होते .
या बलिदानांची ब्रिटिशांनी जी हेळसांड केली ती पाहून कोणत्याही देशभक्तांच्या रक्ताला उकळी फुटली असती .
पंचगंगेच्या तीरावर भारतमातेच्या या लेकरांना बेवारस घोषित करून अग्नि देण्यात आला .
जखमी झालेल्या काझी व वारके यांना त्यांच्या कुटुंबियांनाही भेटू दिले नाही .त्यांच्यावर नीट उपचार ही झाले नाहीत .
चार दिवसांनी साखळदंड घातलेल्या अवस्थेतच क्रांतीवीर नारायण वारके यांना मृत्यूला सामोरे जावे लागले .एकपाय गमावलेल्या काझींचें साखळदंड तुरूगात असताना काढले नाहीत.
भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या पंचप्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारकांना या अमृतमहोत्सवी लाख लाख सलाम करूया आणि कंठरवाने देशाला सांगूंया की
“हे व्यर्थ न हो बलिदान “
जय भारत.
निवेदन : इतिहास अभ्यासक
एम.डी. रावण .
शब्दांकन :व्ही.आर.भोसले.