राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसात पावसाची शक्यता , हवामान खात्याचा अंदाज

नोव्हेंबर उजाडला तरी ‘ऑक्टोबर हिट’ अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आता पावसाचा सामना करावा लागणार आहे. वातावरणातील घडामोडींमुळे सोमवार ते बुधवार दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोव्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची भारतीय हवामानशास्त्र विभागाने शक्यता वर्तवली आहे.
दक्षिण तमिळनाडूमध्ये एक हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होते आहे. त्यामुळे पूर्वेकडून येणारे वारे तीव्र होणार असून दक्षिण, मध्य महाराष्ट्रातील हवेतील आर्दता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार दिवसात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे,
परिणामी दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अंशत: आणि काही ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहिले. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस आकाश निरभ्र आणि दुपारनंतर अंशत: ढगाळ राहणार आहे.
येत्या ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे.दरम्यान, दिवाळी अवघ्या आठवड्यावर आल्याने नागरिक गुलाबी थंडीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील घडामोडींमुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमान वाढले आहे.
दुपारनंतर रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि उकडाही जाणवतो आहे. पहाटे थोडा गारवा आणि दिवसभर ऊन, संध्याकाळी ढगाळ अशा मिश्र वातावरणाचा नागरिक अनुभव घेत आहेत. यामुळे वायू प्रदूषण वाढले असून सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप अशा संसर्गजन्य आजारांचा नागरिक सामना करत आहेत.