मराठा समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही : मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी दोन वाजता सभा घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता दोन वाजता ते सरकारच्या जीआरचे वाचन करतील. साऊंड सिस्टिम व्यवस्थित नसल्यामुळे मनोज जरांगे यांनी थोडावेळासाठी संभाषण थांबवलं. नवीन साऊंड सिस्टिम मागवण्याबाबत चर्चा केली आहे. तोपर्यंत मनोज जरांगे यांनी संबोधन थांबवलं आणि दोन वाजता संबोधन करणार असल्याचं स्पष्ट केलं.
माझ्या माय-बापाला सर्व गोष्टी ऐकू येणं गरजेचं असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे त्यांनी सभा एक तासांनी पुढे ढकलली. नवी मुंबई वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व मराठा समाज एकवटला आहे. मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येतेय.
माझं उपोषण आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरु झालं आहे. सरकारने माझ्यासमोर ज्या गोष्टी, कागदपत्रं ठेवले आहेत. ते तुमच्यासमोर मांडणार आहे. तुमच्या कानावर या गोष्टी घालायच्या आहेत. मी असाच रिकाम्या हाताने परत जाणार नाही, असं जरांगे म्हणाले. मात्र, साऊंड सिस्टिम खराब असल्याने आणि बांधवांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आपली सभा पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आज मराठा आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरांगे आज दोन वाजता सरकारचा जीआर मराठा बांधवांना वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे दोन वाजताच्या सभेत ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.